धर्मांतराची घोषणा येवला परिषद
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपर्यातून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संख्येने येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले. प्रचंड जनसमुदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमुदाय येवला नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृत धोंडिबा रणखांबे होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरू झाले. बाबासाहेब म्हणतात,
मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसर्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसर्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?
बाबासाहेबांच्या या वा्क्यांनी सभेतील लोक मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून द्यावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा. हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यांनी प्रतिध्वनित केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची भीमगर्जना करतात. ती ऐकून भारतातच नाही उभ्या भूतलावर मोठे वादळ उठते. ते म्हणतात,
मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.
ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळते. नसानसांत नवचैतन्य भरणारी ही भीमगर्जना म्हणजे हजारों वर्षांची हिंदूची गुलामी झिडकारण्याच्या अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती. आता अस्पृश्यांच्या जीवनाचे एक नवे पर्व सुरू झाले, ते या येवलाभूमीनी अनुभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताडावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होते) किंवा या हिंदू धर्माला झिडकारून धर्मांतराद्वारे मानवी मूल्ये जपणार्या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तयारी करण्याचा येथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुर्नजन्म झाल्याप्रमाणे स्वतःमधे एक अप्रतिम बदल झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मूल्याच्या झगड्याचा परिणाम होता.
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणार्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात व उत्साहात परतीला निघतात.
No comments:
Post a Comment